Friday, September 30, 2011

दोन ओळी तुझ्या आवाजात गा म्हणतो मी

असंच उगाच कधीतरी दोन ओळी तुझ्या आवाजात गा म्हणतो,
मी भुंग्याचे पंख चढवतो आणि ती ...
निमिषभराच्या स्पर्शासाठी चैत्र्याच्या पालवीगत फुलारते |

Monday, September 5, 2011

नुकतंच आता उजाडतय ग

घन गेले खोलवर भिजवून
नुकतंच मन निथळतंय ग
लांबच लांब रात्र ही कधीची
नुकतंच क्षितीज उगवतंय ग

माहितिये आज तू माझेच शब्द
फिरून मलाच सांगतेयस
कि दृश्य नव्हे दृष्टीत सारं असतं ग
पण आजही तुला ते, बघण्यापेक्षा म्हणनच सोपं वाटतं ग

आज म्हणतेस तू ज्यांना प्रेमाच्या चिंब संध्या
त्या राहिल्या माझ्यासाठी सावल्या कुट्ट काळ्या
घायाळ नजरेला नाही वेदना पारख्या करू शकत ग
त्यांना आता वेगळ्याने मी नाही पाहू शकत ग

आठवतो तुझ्या आवडीचा तो गर्द रक्तवर्णी गंध
देठ त्याचे नेहमीच मला थेट वर्मी रुतले होते
नुकत्याच जखमांवर खवल्या चढतायत ग  
नुकतंच तळहातावर आता रक्त साकळतय ग

तुझ्या नकळत सावली होणं निवडलं होतं मी
नुकतंच कुठे जगणं वाट्याला येतंय
नुकतंच धुकं सरतय अन
नुकतंच आता उजाडतय ग